'पाकिस्तानवर कारवाईबाबत पंतप्रधानांना पूर्ण सहकार्य'
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची ग्वाही
ठाणे: प्रतिनिधी
पहलगाम हल्ला हा संपूर्ण देशावरील हल्ला असून या संबंधात दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीबाबत संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या मागणीला त्यांनी पाठिंबा व्यक्त केला.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात शरद पवार व प्रतिभा पवार यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पहलगाम दहशतवादी हल्ला हा संपूर्ण देशावरील हल्ला आहे. अशा वेळी जात, पात, पंथ, धर्म याचा विचार न करता भारतीय म्हणून आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या काही उपाययोजना करतील त्याला आपले सहकार्य असेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
दहशतवादाच्या विरोधात सामूहिक संकल्प जाहीर करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. या मागणीचे पवार यांनी समर्थन केले. संसदेत अशा प्रकारचा सामूहिक संकल्प करण्यात आला तर दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे, हा संदेश जगभरात पोहोचेल, असा दावा त्यांनी केला.
... पण त्याबद्दल बोलण्याची ही योग्य वेळ नाही
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्युब चॅनेलवर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मुलाखतीनंतर ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चा सुरू झाल्यावर दोन्ही ठाकरे बंधू आपापल्या कुटुंबासह विदेश दौऱ्यावर गेल्यामुळे याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणे पवार यांनी टाळले होते. आज देखील त्यांना या बद्दल प्रश्न विचारला असता, 'ते दोघे बंधू एकत्र आले तर चांगलेच आहे. मात्र, त्याबाबत बोलण्यासाठी ही योग्य वेळ नाही,' अशी मोजकी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.