पुण्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी
अज्ञाताच्या दूरध्वनीनंतर पोलिसांकडून तपास जारी
पुणे: प्रतिनिधी
शहरात पुणे रेल्वे स्थक, भोसरी आणि येरवडा येथे बॉम्ब ठेवण्यात आली असून लवकरच त्याचा स्फोट केला जाणार आहे, अशी धमकी देणारा दूरध्वनी अज्ञात इसमाने सकाळी सव्वा नऊच्या सुमारास महाराष्ट्र पोलिसांच्या 112 या नियंत्रण कक्षाला केला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे.
अज्ञात इसमाकडून धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाणे, केंद्रीय राखीव पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी पुणे रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी केली. मात्र, या वेळी पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. अन्य ठिकाणी तपास सुरू आहे.
अनेक शासकीय कार्यालये, राष्ट्रीय संशोधन संस्था, लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय असलेले पुणे शहर दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. यापूर्वी जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रस्ता या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे या धमकीनंतर पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.