वेटने रणसिंगवाडी येथील उपोषणास डॉ. प्रियाताई शिंदे यांनी भेट देऊन माहिलांना हळदी- कुंकू लावून पाठींबा केला जाहीर
पुसेगाव : नैसर्गिकरित्या सुजलाम सुफलाम असलेल्या वेटणे रणसिंगवाडी गावातील नागरिकांना शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
गेल्या २० वर्षांपासून हक्काच्या पाण्यासाठी लढा देऊनही आमचंच पाणी आम्हांला मिळणार नसेल तर, आता मागे हटणार नाही अशी भावना वेटणे व रणसिंगवाडी या दोन्हीं गावांच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रशासनाकडून या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. मात्र या आंदोलनास खटाव तालुक्यातील गावागावांतून पाठींबा वाढू लागला आहे. दरम्यान रामदास कृष्णा नलवडे (वय ७२ वर्ष) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर उपोषण जागीच उपचार करण्यात आले.
शासनाने तातडीने तोडगा न काढल्यास गांधी जयंतीच्या दिवशी आत्मदहन व जलसमाधीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान या आंदोलनाला खटाव तालुक्यातून विविध गावांचा पाठिंबा वाढू लागला आहे. या आंदोलनास महिलांचाही सहभाग मोठा असून डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी हळदी कुंकूच्या निमित्ताने आंदोलन स्थळी भेट दिली.
मंगळवारी जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता अमोल निकम, उपअभियंता शशिकांत कारंडे, कनिष्ठ अभियंता विवेक स्वामी, बी. टी. पाटील कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट पी. डी. इंचल यांनी उपोषण स्थळी भेट दिली. मात्र जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
ग्रामस्थ व उपोषण कर्त्यांशी सवांद साधताना अमोल निकम म्हणाले, वेटणे गावाचा काही भाग आणि संपूर्ण रणशिंग वाडी या गावातील शेतीला या योजनेचे ०.१३ टी.एम.सी. पाणी मिळावे याबाबतचा मंजुरी प्रस्ताव दि २ जून रोजी सादर केला आहे. तसेच या दोन्हीं गावच्या विहिरी, पाझर तलाव नाला बंडींगचे बोगद्यात उतरणारे पाणी याच भागाला मिळावे म्हणून बोगद्यात एक सिमेंट काँक्रिटचे गेटचे डिझाइन कसे असावे याबाबत सकारात्मक विचार चालू असल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या भागातील ग्रामस्थ पाण्यासाठी गेले २० वर्षे आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागत आहेत. आमदार महेश शिंदे यांनीही ५५ कोटी रुपयांचा निधी याभागाच्या पाणी प्रश्नासाठी मंजूर केला आहे. मात्र शासन दरबारी वेटणे रणसिंगवाडी ग्रामस्थांच्या या आंदोलनाच्या व्यथांची तातडीने दखल घेणार नसतील तर पुसेगावसह संपूर्ण तालुका या आंदोलनात सहभागी होईल, मग सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव यांनी यावेळी दिला. तर याभागातील माणसांच्या भावना,व्यथा आणि मनातील पाण्याविषयी असलेली तळमळ जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल शासनाला सादर करावा असे वडूजचे माजी जि. प. सदस्य बंडा गोडसे यांनी नमूद करून वडूजसह संपूर्ण तालुका या आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे असणार असल्याचे प्रा. गोडसे यांनी सांगितले.
यावेळी के. एम. नलवडे, संजय नलवडे, गोसावी साहेब यांनी ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या. विक्रम विजय नलवडे, संजय रघुनाथ नलवडे, अविनाश दादासाहेब रणसिंग रामचंद्र कृष्णा नलवडे, संदीप रामचंद्र नलावडे, अजित नारायण नलावडे, प्रताप वामन नलवडे, पोपट राजाराम नलवडे, सोपान बापू गुजवटे, अनिल जगन्नाथ रणसिंग, सोमनाथ प्रल्हाद फडतरे, परशुराम मानसिंग फडतरे हे ग्रामस्थ दोन्हीं गावांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरूपात उपोषणास बसले आहेत. दरम्यान उपोषणस्थळी बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे, पुसेगावचे उपसरपंच पृथ्वीराज जाधव, संतोष लावंड (खातगुण), प्रविण पवार (धावडदरे), बुधचे माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, राजेंद्र कचरे, ज्ञानेश्वर जगताप, रोहन देशमुख, धिरज जाधव व विविध गावच्या ग्रामस्थांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी पुसेगावचे बाळासाहेब लोंढे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
000