शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात
अजित पवार यांनी सादर केला निवडणूकपूर्व अर्थासंकल्प
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, महिला युवकांसह समाजातील बहुतेक समाजघटकांसाठी योजनांची बरसात करण्यात आली आहे.
'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल'चा जयघोष
महाराष्ट्राला उज्वल आध्यात्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक परंपरा प्रदान करणारा वारीचा सोहळा सुरू होत आहे. याचे औचित्य साधून अजित पवार यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगासह पुंडलिक वरदा हरी विठ्ठल चा जयघोष करीत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात केली. राज्याच्या या महान परंपरेचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी युनेस्को ला प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वारीतील प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचे अनुदान, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि उपचार याबरोबरच वारीदरम्यान आवश्यक त्या सर्व सुविधा देणारा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मागेल त्याला सौर पंप
शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी या अर्थसंकल्पात मागील त्याला सौर पंप ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना मोफत सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंपासाठी साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीज मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रती हेक्टर 5000 रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचेही पवार यांनी जाहीर केले. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 200 कोटी रुपयांचा फिरता निधीही तयार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे शेतमालाच्या साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना अमलात आणली जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात 100 गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे.
पशुपालन व पूरक व्यवसायांना प्रोत्साहन
पशुपालन, दुग्ध व्यवसाय, पशुखाद्य उत्पादन, कुक्कुट पालन या व्यवसायात मोठा व्हावा असून युवकांनी त्याकडे आकर्षित व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यासाठी दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रात नवे उद्योजक घडविण्यासाठी प्रोत्साहन पर योजना आखल्या जाणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याच्या काळात अर्थार्जण आणि कुटुंबाचे पालन पोषण अशा दुहेरी जबाबदाऱ्या महिला मोठ्या प्रमाणावर पार पाडीत आहेत. अशा महिला वर्गाला आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनाच्या वतीने दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतील. त्यासाठी 46000 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून जुलै 2024 पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
दरवर्षी तीन सिलेंडर मोफत
घर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या प्रकारावर कुटुंबाचा कणा असलेल्या महिलेचे आरोग्य अवलंबून असते. एलपीजी गॅस हे सुरक्षित इंधन असल्यामुळे त्याचा लाभ महिलांना घेता यावा यासाठी पात्र कुटुंबांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेचा लाभ राज्यातील 52 लाख 16 हजार 400 कुटुंबांना मिळणार असून त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या कामालाही हातभार लागणार आहे, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, प्रत्यक्ष रोजगार आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा पवार यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 50 हजार युवकांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण
कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत राज्यातील 500 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांच्या दर्जात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, जागतिक कौशल्य केंद्र अशा संस्थांचे बळकटीकरण करण्याबरोबरच उद्योजकता विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. गोवंडी येथे रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारले गेले असून या ठिकाणी युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे युवकांचे प्रशिक्षण आणि संशोधन यासाठी पार्टी आणि सारथी अशा संस्थांनाही अधिक सशक्त केले जाणार आहे, असे पवार यांनी सांगितले.