'...हा आनंद देशासाठी घातक'
संजय राऊत यांचा काँग्रेस आणि अण्णा हजारे यांनीही टोला
मुंबई: प्रतिनिधी
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा पराभव झाल्याचा आनंद काँग्रेस आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना झाला असेल तर तो देशासाठी घातक ठरणार आहे. केजरीवाल यांचा पराभव झाला असला तरी देखील सत्तेवर भारतीय जनता पक्ष आला आहे, हे विसरू नका, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यापूर्वी दशकभर सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 48 जागा मिळवल्या आहेत तर आम आदमी पक्षाला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. खुद्द पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी बांधण्यात आलेली इंडिया आघाडीची मोट या निवडणुकीच्या काळात संपुष्टात आली. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्रित निवडणूक लढले असते तर चित्र वेगळे दिसले असते, असे मत व्यक्त केले आहे. या पुढच्या काळात एकत्र राहायचे की एकमेकांच्या विरोधात लढायचे याचा निर्णय घ्या. अन्यथा देशात सध्या जे काही सुरू आहे त्याला आपली मान्यता असल्याचे जाहीर करा, अशा कानपचक्या राऊत यांनी काँग्रेसला दिल्या आहेत.
ज्या अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व आकाराला आले आणि त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली, त्या अण्णा हजारे यांनी देखील निकालानंतर केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यापासूनच अण्णा त्यांच्यावर टीका करीत आहेत. आप च्या स्थापनेनंतर आपण केजरीवाल यांच्याशी संपर्क तोडला असल्याचे अण्णा यांनी सांगितले. अण्णांच्या या भूमिकेवर देखील राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
अण्णा हजारे यांच्या वक्तव्यांना आता फारसा अर्थ उरलेला नाही. एकेकाळी सातत्याने भ्रष्टाचार विरोधात आंदोलने करणाऱ्या अण्णांनी मागील काही वर्षात देशात जे काही घडले त्याबद्दल कोणतीही भूमिका घेतलेली नाही. देश विकला जात आहे. सार्वजनिक मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पावन करून घेतले जात आहे. मात्र, यावर अण्णांनी ब्र शब्द काढलेला नाही. या मागचे रहस्य काय, असा सवालही राऊत यांनी केला.
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवावर केजरीवाल यांनी आत्तापर्यंत संयत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा पराभव आपण स्वीकारल्याचे त्यांनी जाहीर रित्या सांगितले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील त्यांनी भाजपला केले आहे.
Comment List