'एक लाडकी बहीण योजना बंद केली तर...'
रामदास कदम यांचा सरकारला घरचा आहेर
मुंबई: प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीची आकडेवारी पाहता ही एक योजना बंद केली तर आणखी दहा योजना अमलात आणता येतील, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अमलात आणली. ही योजना विधानसभा निवडणुकीत 'गेम चेंजर' ठरल्याचे सांगितले जाते. महायुती पुन्हा सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा दीड हजार रुपयाचा निधी 2100 रुपयापर्यंत वाढविण्यात येईल, असे आश्वासन देखील महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी 53 लाख महिला लाभार्थींना 33 हजार 232 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
या खर्चिक योजनेबद्दल सरकारला खडे बोल सुनावताना रामदास कदम म्हणाले की, शेवटी अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात. खर्च आणि निधीची उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखाव्या लागतात. एकट्या लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी 30 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन विकासाची वाटचाल करावी लागते. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना अमलात आणता येतील.