"... तर रशियावर कडक आर्थिक निर्बंध'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
रशिया युक्रेन मधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेने सादर केलेला शांतता प्रस्ताव रशियाने बऱ्या बोलाने मान्य करावा. अन्यथा अमेरिकेला कडक आर्थिक निर्बंधासारख्या कठोर मार्गांचा अवलंब करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
आपण रशियाच्या बाबतीत वाईटात वाईट उपायांचा अवलंब करू शकतो. मात्र, आपल्याला तसे करण्याची इच्छा नाही. आपल्याला केवळ रशिया आणि युक्रेन मध्ये शांतता निर्माण करणे हेच आपले उद्दिष्ट आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
शांतता प्रस्ताव रशियाच्या गळी उतरवण्यासाठी अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांचे पथक रशियाला रवाना होत आहे. रशियाने आपला प्रस्ताव मान्य करून युद्धबंद स्वीकारावी, असे आवाहन केले आहे. युक्रेनने ३० दिवसांचा युद्धविराम मान्य केल्यानंतर रशियाबरोबर अमेरिकेच्या चर्चांना वेग आला आहे. अमेरिकेने काहीही करून युद्धबंदी घडवून आणावी, असा युक्रेनचा आग्रह आहे.
आमचे पथक रशियाला रवाना होत असून रशियाकडून युद्धबंदीला मान्यता मिळेल अशी आशा आहे. जर तसे घडले तर तब्बल तीन वर्षे सरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील रक्तपाताला थांबवण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असे म्हणावे लागेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
Comment List