'आत्मघातकी पथकाच्या हल्ल्यात नव्वद पाक सैनिक ठार'
बलोच लिबरेशन आर्मीचा दावा
पेशावर: वृत्तसंस्था
संपूर्ण जगाला अचंबित करणाऱ्या जफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणानंतर बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराला आणखी एक मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करून 90 पाक सैनिकांना कंठस्नान घातल्याचा दावा बलोच लिबरेशन आर्मीने केला आहे.
नौशकीनजीकच्या महामार्गावरून जाणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या बसेसच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाक लष्कराची एक बस पूर्णपणे जळून खाक झाली तर आत्मघातकी पथकातील एक बलोच जवान जागीच ठार झाला.
त्यानंतर त्वरित आत्मघातकी पथकातील जवानांनी आणखी एका बसला वेढा घालून त्यातील जवानांना एक एक करून ठार मारले. या हल्ल्यात पाक सैन्यातील 90 जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा बलौच लिबरेशन आर्मीने केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या ताब्यात एकूण आठ बसेसचा समावेश होता.
बलोच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदार स्वीकारली असून या हल्ल्याचा तपशील लवकरच माध्यमांसमोर आणला जाईल, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
Comment List