उद्धव ठाकरे गटाचे खासदार भाजप आमदारांच्या भेटीला
नाशिकच्या राजकारणात जुळत आहेत का नवी समीकरणे?
नाशिक: प्रतिनिधी
एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसताना येथील ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारतीय जनता पक्षाच्या केवळ आमदारांचीच नव्हे तर भाजप कार्यालयात जाऊन पक्ष पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव करून खासदार झालेले उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देवयानी फरांदे यांनी भगवे वस्त्र आणि स्मृतीचिन्ह देऊन वाजे यांचे स्वागत केले. त्यानंतर या नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली.
या भेटीनंतर वाजे यांनी भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयात जाऊन भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. वर्करणी ही भेट सदिच्छा भेट होती आणि या भेटीत झालेल्या चर्चा शहराच्या विकासाबाबत केल्या गेल्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र, वाजे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Comment List