'वाल्मीक कराड याची चल अचल मालमत्ता जप्त करावी'
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची न्यायालयाकडे मागणी
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याची चल अचल मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात केली आहे. त्याचप्रमाणे संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे चित्रण सार्वजनिक केले जाऊ नये, अशी विनंती देखील सरकार पक्षाने न्यायालयाला केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. या सुनावणीत सरकारच्या वतीने वाल्मीक कराड याची मालमत्ता जप्त करण्यात यावी, असा अर्ज न्यायालयाकडे करण्यात आला आहे. कराड याच्यावतीने यासंदर्भात अद्याप न्यायालयात आपले म्हणणे मांडलेले नाही. या पुढील काळात या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालय या संदर्भात कराड याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देते का, याबाबत उत्सुकता आहे.
देशमुख यांना करण्यात आलेल्या मारहाणीचे चित्रण खुद्द आरोपींच्या कडूनच करण्यात आलेले आहे, हे राज्य अन्वेषण विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हे चित्रण सीलबंद करून न्यायवैद्यक विभागाकडे पाठवण्यात आले. हे चित्रण सार्वजनिक झाल्यास कायदा सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हे चित्रण सार्वजनिक केले जाऊ नये, अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत न्यायालयाने सर्व आरोपींचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. टॉवर उभारणी करणाऱ्या कंपनीकडे आपण खंडणी मागितलेली नाही, असे दावे करून वाल्मीक कराड हा या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करू पाहत आहे. तशा अर्थाचा अर्ज त्याने न्यायालयात दाखल केला आहे, अशी माहिती उज्वल निकम यांनी दिली.