'आमचाच निधी आम्हाला वेळेत न मिळणे ही शोकांतिका'
परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची अर्थ खात्यावर टीका
मुंबई: प्रतिनिधी
एसटी महामंडळाचा कारभार सांभाळणे आव्हानात्मक असून महामंडळाचा चेहरा मोहरा बदलण्याचे आव्हान आपण स्वीकारल्याची ग्वाही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याच वेळी आमचाच निधी आम्हाला वेळेत न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार करता न येणे ही शोकांतिका आहे, अशा शब्दात त्यांनी अर्थ विभागाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आमच्याकडून गेलेले प्रस्ताव आणि मागण्या अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू न देता अधिकारी परस्पर परत पाठवत असल्याची टीकाही त्यांनी केली.
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात पूर्ण पगार न देता निधी अभावी केवळ 56 टक्के वेतन दिले गेले आहे. या समस्येवर तोडगा निघाला असून मंगळवारी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात येईल, अशी ग्वाही देखील सरनाईक यांनी दिली आहे. यापुढे दर महिन्याच्या सात तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेच पाहिजे. त्यासाठी गरज पडली तर प्रसंगी सर्व औपचारिकता सोडून देऊन दर महिन्याच्या पाच तारखेला आपण अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडू, असेही ते म्हणाले.
आगामी अडीच वर्षाच्या कालावधीत एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलून दाखवू. प्रत्येक छोट्या मोठ्या खर्चासाठी अर्थ विभागाकडे धाव घ्यावी लागणार नाही या दृष्टीने महामंडळाला आर्थिक दृष्ट्या सक्षम स्वरूप देऊ, अशी ग्वाही देखील सरनाईक यांनी दिली.
सध्या एसटी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या हजारो बसेस कालबाह्य ठरलेले आहेत. मात्र, प्रवाशांना सेवा द्यावी यासाठी नाईलाजाने आम्ही त्या रस्त्यावर आणत आहोत. एसटी महामंडळाला नवीन बसेस ची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षात 25 हजार नव्या अत्याधुनिक बसेस महामंडळाच्या ताब्यात येतील, या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मान्यता दिली आहे, असेही सरनाईक यांनी सांगितले.
राज्यभरात एसटी महामंडळाचे 860 डेपो आहेत. या डेपोंकडे विस्तीर्ण आणि मोक्याच्या जागा आहेत. या जागा बांधा, वापरा, हस्तांतरित करा अथवा खाजगी, सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर विकसित करून मोठ्या प्रमाणावर निधी उभारणी केली जाणार आहे. या जागांचे नियोजन योग्य पद्धतीने झाल्यास एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
महामंडळाच्या 170 डेपोमध्ये पेट्रोल पंप आहेत. या पंपांना आधुनिक स्वरूप प्राप्त व्हावे आणि एसटी महामंडळाच्या बसेस ना किफायतशीर दरात इंधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने हे पंप रिलायन्स किंवा इंडियन ऑइलसारख्या कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने या कंपन्यांकडून चांगले प्रस्ताव देखील प्राप्त झाले आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले.
एसटी महामंडळाला जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. अनेक ठेकेदार वीस, तीस वर्षापासून आपल्या जाहिराती प्रदर्शित करीत आहेत. त्यांच्याकडून मिळणारा निधी अनियमित आहे. अत्यल्प आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी नव्या निविदा काढून जाहिरातीद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न शंभर कोटी रुपयांवर नेणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नवीन बसेसमध्ये पार्सलसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊन पार्सलद्वारे येणाऱ्या उत्पन्नातही भरघोस वाढ केली जाईल, असेही ते म्हणाले.
स्वारगेट प्रकरणानंतर बसेसमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यापुढे प्रत्येक बसमध्ये पेनिक बटन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस असणे आवश्यक केले जाणार आहे. नव्या बसेस खरेदी करताना उत्पादकांनाच या सुविधा बसमध्ये उपलब्ध करून देण्यास सांगण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
यापुढील काळात एसटीच्या डेपोंना अत्याधुनिक स्वरूप दिले जाणार आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, तसेच त्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील उत्तम सुविधा उपलब्ध करून देणार आहे, असे सांगताना सरनाईक यांनी दोन वर्षात एसटीला कॉर्पोरेट स्वरूप देणार असल्याचे नमूद केले. मात्र, हे सर्व करत असताना एसटी महामंडळ सध्या देत असलेल्या कोणत्याही सवलती रद्द केल्या जाणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.