जलयुक्त शिवार अभियान; शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
पुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करावे. यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींना सहभागी करुन घ्यावे. जी नवीन, दुरूस्तीची कामे या योजनेत समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे आढळून आले, त्यांच्याबाबत सविस्तर नोंदी घेऊन अंदाजपत्रके तयार करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वनविभागाचे उप वनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, शिवारफेरीमध्ये प्रत्यक्ष गावात भेटी देऊन नोंद असलेल्या अस्तित्वातील मृद व जलसंधारण संरचनांची स्थळ पडताळणी करण्यासह नोंद नसलेल्या मात्र नव्याने आढळलेल्या संरचनांची नोंद घेण्यात येणार आहे. पडताळणी व नोंद केल्यानंतर सद्यस्थिती व उपयुक्ततेबाबत माहिती मोबाईल ॲपमध्ये अचूकपणे भरण्याचे काम करावे. लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाही शिवारफेरीच्या वेळीच करून घ्यावी.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या ६८ लाख ६६ हजार घन मीटर गाळ काढण्याच्या २२० कामांना प्रशासकीय मान्यता तात्काळ द्यावी. जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील तसतशी गतीने प्रशासकीय मान्यता द्यावी. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांची यंत्रणा ज्या तालुक्यात अधिक आहे अशा ठिकाणी त्यांना कामे द्यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. अटल भूजल योजनेंतेर्गत नळपाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरणाची कामे हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले.
यावेळी हांडे यांनी सादरीकरण करून माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये सर्व विभागांच्या मिळून ५६ कोटी ३७ लाख रुपयांच्या एकूण ५ हजार ४५५ कामांना आराखड्यास मान्यता देण्यात आली. लेखाशीर्षांतर्गत हाती घेतलेल्या ७९५ पैकी ७४३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीत आहेत. अभिसरणातील ४ हजार ५५३ कामे पूर्ण झाली असून ५२ कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या १०० दिवस कृती कार्यक्रमादरम्यान या अभियानातंर्गत ५३१ कामांपैकी ३८७ पूर्ण झाली असून उर्वरित सुरू आहेत, असे सांगण्यात आले.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, व नाला खोलीकरण अंतर्गत ४७ कोटी ७७ लाख रुपयांच्या १९६ कामांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १३४ कामे पूर्ण झाली असून २९ लाख घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या १३८ पैकी १०० कामे पूर्ण झाली असून २० प्रगतीपथावर आहेत, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीत अमृत सरोवर योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० जलशक्ती अभियान- कॅच द रेन (जल संचय जन भागिदारी) आदींचाही आढावा घेण्यात आला.
000