महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त 13 ते 19 एप्रिल दरम्यान रंगणार  'जागर संविधानाचा'

रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांनी दिली माहिती

महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त 13 ते 19 एप्रिल दरम्यान रंगणार  'जागर संविधानाचा'

पुणे: प्रतिनिधी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम 'जागर संविधानाचा'  हा 13 ते 19 एप्रिल दरम्यान विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश संघटन सचिव  परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के, तानाजी तापकीर आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना वाडेकर म्हणाले, 'जागर संविधानाचा' अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल नागरिकांना तब्बल आठवडाभर अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनात पुणे महापालिकेच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. महोत्सव समितीच्या वतीने यापूर्वी गणेश कला क्रीडा रंगमंच, शनिवार वाडा अशा विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यंदाचे  सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, बोपोडी, पुणे येथे होणार आहेत.

हे पण वाचा  वाढदिवसाच्या केकवर दंड संहितेतील कलमांची नक्षी

या उपक्रमांतर्गत दिनांक 13 रोजी रात्री बारा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा 2025 हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये धम्मवंदना, भीमस्तुती, भीमस्मरण आणि नजरबंदी करणारी फटाक्यांची भव्य आतिषबाजी यांचा समावेश आहे.

तिन्ही महापुरुषांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी दिनांक 14 रोजी सायंकाळी सहा वाजता 'जयंती जल्लोष' हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यामध्ये भव्य लाईट अँड साऊंड शो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

आंबेडकरी चळवळीतील शाहीर मीराताई उमप यांच्या भारुड आणि आंबेडकरी जलसा चा कार्यक्रम दिनांक 15 रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे तर, संगीतकार जॉली मोरे व शाहीर सीमा पाटील यांचा 'वुई द पीपल' हा संगीत महानाट्य आणि आंबेडकरी जलसा चा कार्यक्रम दिनांक 16 रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या 'थेट तुमच्या घरातून' या नाटकाचा प्रयोग दिनांक 17 रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार असून उदय साटम लिखित आणि दिग्दर्शित 'गौरव संविधानाचा' हा कार्यक्रम 18 तारखेला संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय संविधान आणि महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम 'होम मिनिस्टर' याने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व  कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परशुराम वाडेकर यांनी केले आहे.

‘फुले’  चित्रपटाला पाठिंबा

चित्रपट सेन्सॉर बोर्डने अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले‘ या चित्रपटात तब्बल 12 बदल सुचवले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. जात, मनू, मांग, महार वगैरे शब्द, सावित्रीबाईंच्या अंगावर मुलांनी शेण फेकण्याचा प्रसंग, पेशवाईचा उल्लेख, तुमचे हात आणि पाय वेगळे केले असते हा संवाद चित्रपटातून काढा, असे या स्वतःला विद्वान समजणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने  दिग्दर्शकाला सांगितले आहे. या मंडळींना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य आणि त्यांचे काम माहीतच नसणार. या सेन्सॉर बोर्डने आधी कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न एका दिग्दर्शकाला केला होता.  समाज सुधारकांचे कार्य लोकांच्या पुढे येऊ नये असे सेन्सॉर बोर्डाला वाटते, परंतु आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष 'फुले' चित्रपटाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

About The Author

Advertisement

Latest News

Advt