महापुरुषांना जातीच्या राजकारणात का आणता आहात?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा रोकडा सवाल
मुंबई: प्रतिनिधी
आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महापुरुषांना जातीपातीच्या राजकारणात का आणता आहात, असा रोकडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यातील जिव्हाळ्याच्या समस्यांपासून सर्वसामान्य जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी असे प्रकार करण्यात येत असल्याची टीका देखील त्यांनी केली.
प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या फुले या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि त्यांच्या टीमने राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर दाखविण्यात आले. या वेळी राज ठाकरे यांनी या चित्रपटातील प्रसंग योग्य असल्याचे सांगत केवळ ट्रेलरवरून आपले मत बनवू नका. त्यासाठी पूर्ण चित्रपट बघा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
चित्रपटात खरा इतिहास दाखविण्यात आला असेल तर त्यात कोणतेही बदल करण्याची आवश्यकताच नाही. बिनधास्त चित्रपट प्रदर्शित करा. वास्तविक या चित्रपटाचे प्रदर्शन महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच व्हायला हवे होते. यात कोणतेही जातीचे राजकारण करू नका, असे सांगत राज ठाकरे यांनी आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, जाती निर्मूलन आणि समाज परिवर्तनाचे कार्य फुले या चित्रपटा द्वारे रुपेरी पडद्यावर आणण्यात आले आहे. हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात महात्मा फुले यांची भूमिका प्रतीक गांधी यांनी केली आहे तर सावित्रीबाई फुले अभिनेत्री पत्रलेखा यांनी साकारली आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विशेषतः ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाला विरोध व्यक्त केला आहे. सेन्सर बोर्डाने देखील या चित्रपटात काही बदल सुचविले आहेत. मात्र, कोणतेही बदल न करता हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्ट केले आहे.