अर्मेनिया- अझरबैजान यांच्यात पुन्हा युद्धाची नांदी
वादग्रस्त सीमेवरील लष्करी सरावामुळे तणाव टोकाला
येरेवन: वृत्तसंस्था
तब्बल तीन वर्षापासून सुरू असलेले रशिया युक्रेन युद्ध संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्ह दृष्टिक्षेपात नसताना अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू असूनही वादग्रस्त सीमारेषेवर अर्मेनियाने इराणच्या सैन्यासह युद्धसराव केल्याने दोन्ही देशांमधील तणाव टोकाला पोहोचला आहे.
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर अर्मेनिया आणि अझरबैजान हे देश अस्तित्वात आले. या देशांमध्ये जन्मापासूनच नार्गोनो काराबाख या सीमावर्ती प्रदेशाच्या मालकीवरून वाद सुरू आहे. या डोंगराळ प्रदेशात वास्तविक आर्मेनियन लोकांची संख्या अधिक आहे. मात्र, हा भूभाग अझरबैजानचा असल्याची आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. या मुद्द्यावरून तब्बल चार दशके दोन्ही देशांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे.
दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मागील काही काळापासून प्रयत्न सुरू आहेत. या देशातील शांतता समझोत्याचा मसुदा देखील तयार आहे. मात्र, दोन्ही देशांमध्ये परस्परांबद्दल अविश्वासाचे वातावरण कायम आहे. दोन्ही देश एकमेकांवर सैन्याची जुळवाजुळव करून सीमा अशांत ठेवत असल्याचा आणि वारंवार युद्धबंदीचा भंग करीत असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे दोन्ही देश शांतता समझोत्यावर स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत.
वास्तविक एक महिन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला. मात्र, या प्रस्तावात अझरबैजानने घातलेली एक अट आर्मेनियाने धुडकावून लावली आहे. अर्मेनियाच्या घटनेत नार्गोन कारबाखचा भूभाग आपला असल्याचा दावा केला आहे. अर्मेनियाने घटना दुरुस्ती करावी आणि वादग्रस्त भूभागावरील आपला दावा काढून घ्यावा, अशी अट अझरबैजानने घातली आहे. ही अट अर्मेनियाला मान्य नाही. आपण वादग्रस्त भागात सन 2027 मध्ये जनमत घेऊ आणि त्यानुसार या भागावर चा दावा सोडण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्यासाठी शांतता करार रोखून धरला जाऊ नये. नार्गोन कारबाखच्या भूभागाबद्दल स्वतंत्र करार करता येऊ शकतो, अशी अर्मेनियाची भूमिका आहे. मात्र, अझरबैजान आपल्या अटीवर ठाम आहे.
वादग्रस्त सीमाभागावरून अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये यापूर्वी दोन वेळा युद्ध झाले आहे. अझरबैजानने सन 2023 मध्ये कारबाखवर लष्करी कारवाई करून या भागातील एक लाख पेक्षा अधिक अर्मेनियन नागरिकांना हाकलून लावले होते.
अझरबैजान, अर्मेनिया आणि भारत
अर्मेनिया आणि भारत हे एकमेकांचे मित्र देश आहेत. यांच्यामध्ये तब्बल तीन दशकांहन अधिक काळ राजनैतिक संबंध सलोख्याचे आहेत. भारताने अर्मेनियाला वारंवार लष्करी सहकार्य केले आहे. नुकताच भारताने अर्मेनियाला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला आहे. ब्राह्मोसची कार्यक्षमता लक्षात घेऊन अझरबैजानाने तिसऱ्या देशाला पुढे करून ब्राह्मोस मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारत आणि तो हाणून पाडला. त्यामुळे अझरबैजान आता पाकिस्तानच्या वळचणीला जाऊन बसला आहे. पाकिस्तानकडून लष्करी साहित्य मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.