'... ही मागणी पांडुरंगाकडे करण्याचे कारणच नाही'
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती
पंढरपूर: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह आम्ही सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करीत आहोत. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे काय, याबाबत विचार करण्याचे काहीच कारण नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या काळात राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधक झालेले काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांनी राजकीय दृष्ट्या पुन्हा एकत्र यावे, यासाठी पांडुरंगाकडे साकडे घातले काय, या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांनी ही स्पष्टोक्ती केली. तटकरे हे सहकुटुंब पांडुरंगाच्या दर्शनासाठी येथे आले असता देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि माझ्यासारख्यांनी पूर्ण विचारांती राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता उद्याच्या भवितव्यासाठी मोदी आणि शहा यांच्याबरोबर राजकीय दृष्ट्या काम करीत आहोत. या कामात आपल्याला यश लाभावे, अशी प्रार्थना पांडुरंग चरणी केल्याचे तटकरे यांनी सांगितले.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेत भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी खुद्द शरद पवार यांच्यावर अनेकदा कठोर टीका देखील केली. मात्र, विशेषतः लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका बसल्याचे लक्षात आल्यावर त्यांची भूमिका काहीशी सौम्य झाली आहे. महायुतीबरोबर राहण्याचा त्यांचा निर्धार कायम असला तरी देखील शरद पवार यांच्यावर टीका करणे ते टाळत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार हे कालही आपले दैवत होते आणि आजही आपले दैवत आहेत, असे विधान त्यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का, याबाबत कुजबूज सुरू झाली आहे. मात्र, सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.