'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज ठाकरे यांना टोला
मुंबई: प्रतिनिधी
पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकणे या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य करणे योग्य असून मातृभाषेसह इतर भाषा शिकण्यावरून वाद निर्माण करणे हा रिकाम टेकड्यांचा उद्योग असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला.
महाराष्ट्रात या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार असून त्यानुसार पहिलीपासून मराठी बरोबरच इंग्रजी आणि हिंदी या भाषांचे शिक्षण घेणे आवश्यक करण्यात आले आहे. मनसेचा या धोरणाला विरोध आहे. केंद्र सरकारकडून हिंदी भाषा इतर राज्यांवर अकारण लादली जात असल्याचा मनसेचा आक्षेप आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदी ही भाषा भारतात अनेक राज्यांमध्ये बोलली जाते. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा काही जणांचा दावा आहे. त्याबद्दल वादही आहे. त्या वादात पडण्यात आपल्याला रस नाही. रिकाम टेकड्या लोकांना असले वाद घालण्यात रस असतो. त्यातच ते वेळ घालवतात, अशी टीका अजित पवार यांनी केली.
इंग्रजी ही जागतिक स्तरावर चालणारी भाषा असल्यामुळे तिला महत्त्व आहे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. मात्र, मातृभाषा प्रथम स्थानावर आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, मनसेने अजित पवार यांच्या भूमिकेचा कडक शब्दात समाचार घेतला आहे.
... तर दादांना परत शाळेत जाण्याची गरज
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा अजित दादांचा समज असेल तर त्यांना परत शाळेत घालण्याची गरज आहे, असा पलटवार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. हिंदी शिकण्याची शक्ती करणे मनसेला अमान्य आहे. त्यासाठी मनसे संघर्ष करेल. हा संघर्ष टोकाचा असेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला. आज हिंदीची सक्ती करत आहात. उद्या गुजराती आणि तामिळ शिकण्याची शक्ती कराल. आम्ही ती मान्य का करावी? आमच्या राज्याची मातृभाषा आम्ही शिकू. इतर भाषांची सक्ती आमच्यावर का करता, असे सवाल देशपांडे यांनी केले.