काकांच्या पक्षासह मित्र पक्षालाही अजित दादांचा धक्का
सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते हाती बांधणार घड्याळ
मुंबई: प्रतिनिधी
आपल्या काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीतील मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पक्ष या दोघांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपचे महत्त्वाचे नेते आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गटार प्रवेश करणार आहेत.
अजित पवार यांनी शरद पवार यांचे नेतृत्व झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळी चूल मांडली त्यावेळी अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही मोठ्या नेत्यांनी अजित पवार यांना साथ दिली नव्हती. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्या पाठोपठ चार माजी आमदारांसह अनेक महत्त्वाचे नेते आज अजित पवार गटात येत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट करणार आहेत..
शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात तर विलासराव जगताप हे भारतीय जनता पक्षात आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नाहीत. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्या पक्षात जायचे, याचा विचार वनिमय करण्यासाठी या नेत्यांच्या मागील काळात चार बैठका झाल्या. विचारांची त्यांनी हाती घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. रवी तिम्मनगौडा पाटील हे भारतीय जनता पक्षाचे असून ते जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. ते देखील अजित पवार गटात प्रवेश करीत आहेत.