बालाकोटची पुनरावृत्ती करण्यासाठी भारताची तयारी
पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला मिळणार चोख प्रत्युत्तर
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सूत्र पाकिस्तानातील रावळपिंडी येथून हलवली गेल्याची माहिती उघड झाली आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा भारताचा विचार असून त्यासाठी बालाकोटसारखा दुसरा सर्जिकल स्ट्राइक करण्याची भारताची तयारी आहे.
पहलगाम येथे दोन गटात विभागलेल्या पाकिस्तानी आणि काश्मिरी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून बिगर मुस्लिम पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात 27 पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्याची माहिती मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबिया च दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले. त्यांनी विमानतळावरच बैठक घेऊन या हल्ल्याची माहिती घेतली व पुढील कारवाईबाबत प्राथमिक चर्चा देखील केली. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जय शंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री उपस्थित होते. आज दुपारी अकरा वाजता देखील पंतप्रधानांनी सुरक्षाविषयक मंत्री समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील कारवाईबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सन 2019 मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ला करून तिथला दहशतवादी तळ नष्ट केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पुन्हा बालाकोटची पुनरावृत्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी दि रेजिस्टन्स फ्रंट या लष्करे तय्यबा अंतर्गत काम करणाऱ्या संघटनेने घेतली आहे. या हल्ल्याची सूत्र रावळपिंडी येथून हलवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.