पाकिस्तानच्या विरोधात भारताने उचलली कठोर पावले
सिंधू जल करार रद्द, पाकिस्तानच्या तोंडाला येणार फेस
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात भारताने कठोर पावले उचलली आहेत. सिंधू जल करार रद्द करण्याबरोबरच पाकिस्तानी नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द करणे, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश आणि वाघा अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय यांचा त्यात समावेश आहे.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून 28 जणांचे बळी घेतले तर सुमारे 20 जण जखमी आहेत. या भ्याड हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्करे तय्यबाचा भाग असलेल्या दि रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पाकिस्तानातच या हल्ल्याचा कट रचला गेल्याचे आणि त्याची सूत्र हलविण्याची खात्रीलायक माहिती भारतीय गुप्तचरांना उपलब्ध झाली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मतभेद झाल्याने जागतिक बँकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये पाणी वाटपाचा करार 1960 साली करण्यात आला. या करारानुसार रावी, सतलज, आणि बियास या सिंधू नदीच्या उपनद्यांचे पाणी भारताला उपलब्ध होते. सिंधू नदीच्या पाण्यापैकी 80 टक्के पाणी पाकिस्तानच्या वाट्याला तर 20 टक्के पाणी भारताच्या वाट्याला देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धांच्या काळातही या कराराचे पालन करण्यात आले. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा करार भारताने रद्द केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडाला फेस येणार हे नक्की आहे.
त्याचप्रमाणे भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी पुढील 48 तासात भारतातून निघून जावे, असे आदेश देण्यात आले आहेत. भारत आणि ज्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मंजूर केला असेल तो देखील रद्द करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानची वाघा अटारी बॉर्डर एक मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील भारताने घेतला आहे.