'हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना थारा नाही'
अली दारुवाला यांचे दहशतवाद्यांना खुले पत्र
पुणे: प्रतिनिधी
पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी खुल्या पत्राद्वारे दहशतवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.'पहलगाम येथील हल्ला हा भारतीय सार्वभौमत्वावर हल्ला असून हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना थारा दिला जाणार नाही',असा इशारा त्यांनी दिला आहे.
अली दारुवाला यांनी अत्यंत भावनिक आणि तितकेच तीव्र असे खुले पत्र लिहून दहशतवाद्यांचा निषेध केला आहे. "तुम्ही केवळ काश्मीरवर हल्ला केला नाही,तुम्ही भारताच्या आत्म्यावर वार केला आहे.आम्ही हे सहन करणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
'या हल्ल्याने भारतात शांतता, एकता आणि न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हादरवले आहे.पहलगाम हे केवळ एक ठिकाण नाही,ते भारताच्या मूल्यांचे प्रतीक आहे. त्या भूमीवर रक्त सांडून तुम्ही आमचा कमकुवतपणा दाखवला नाही, तर आम्हाला अधिक सजग केलं आहे',त्यांनी लिहिले आहे
'दहशतवाद्यांचे "इस्लामसाठी" किंवा "काश्मीरसाठी" लढ्याचे दावे फेटाळून लावत, दारूवाला म्हणाले, "तुम्ही स्वातंत्र्यसैनिक नाही, लढवय्ये नाही. तुम्ही गोंडस घोषणांमागे लपलेले भ्याड लोक आहात. तुम्ही धर्माचं रूपांतर, दहशतीच्या हत्यारात केलं आहे,जे अत्यंत निषधार्ह आहे",असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकारांमुळे देशातील सामान्य मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहिलं जातं, याबद्दलही आपल्या पत्रात दारुवाला यांनी दु:ख व्यक्त केलं. "तुमच्यामुळे प्रत्येक मुस्लिम नाव, प्रत्येक टोपी, प्रत्येक हिजाब संशयात सापडतो. तुम्ही केवळ जीव घेतले नाहीत, तर विश्वासच हिरावून घेतला.",असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील एका प्राचीन आणि देशसेवेची परंपरा असलेल्या कुटुंबातील दारुवाला यांनी त्यांच्या देशभक्तीचा उल्लेख करत कुरआनमधील ओळी उद्धृत केल्या आहेत
“जो कोणी एका निरपराध जीवाचा जीव घेतो, त्याने जणू संपूर्ण मानवजातीचा खून केलेला असतो.” — [कुरआन ५:३२]