पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना भारतीय सैनिकांनी घेरले
दहशतवादी आणि सुरक्षा सैनिक यांच्यात गोळीबार सुरू
श्रीनगर: वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी शोधून काढले आहे. पहलगाम जवळच्या डोंगराळ जंगल परिसरात हे अतिरेकी आढळून आले आहेत. जवान आणि अतिरेक्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. या हल्लेखोरांमध्ये हाशिम मुसा या पाकिस्तानी स्पेशल फोर्समधील निवृत्त पॅरा कमांडोचाही समावेश आहे.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी देखील झाले आहे. या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात मोठी कारवाई करण्याचा भारताचा विचार आहे.
या हल्ल्यानंतर पहलगाम येथील सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. आज या मोहिमेला यश आले असून पहलगामच्या जवळच असलेल्या जंगलात हे दहशतवादी सापडले आहेत. वाहन नेण्यासारखा रस्ता नसल्यामुळे हे सात दहशतवादी पायी चालतच पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेने निघाले होते. त्यांच्याकडे सॅटेलाईट फोन आणि शस्त्रास्त्र देखील आहेत. त्यांची आणि सुरक्षा सैनिकांची चकमक सुरू आहे.