पाकिस्तानच्या घशाला कोरड, दणाणले धाबे
भारताने रोखले चिनाब नदीचे पाणी, झेलम देखील रोखणार
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारताने बागलहार धरणाचे दरवाजे बंद करून चिनाब नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे आत्ताच पाकिस्तानच्या घशाला कोरड पडली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. लवकरच झेलम नदीचे पाणी रोखण्याची तयारी भारत आणि केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान बरोबर असलेला सिंधू जल वाटपाचा करार स्थगित केला आहे. आता त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. चिनाब आणि झेलम या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. यांचे बहुतांश पाणी सिंधू करारानुसार पाकिस्तानच्या वाट्याला गेले आहे. मात्र, भारत आणि हा करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
भारताने धरणाचे दरवाजे बंद करून चिनाब नदीचे पाणी रोखल्यामुळे या नदीच्या पाकिस्तानातील प्रवाहात तब्बल 90 टक्क्याने घट झाली आहे. अर्थातच, नदीचे पात्र जवळजवळ कोरडे पडले आहे. काही दिवसातच किशनगंगा धरणाचे दरवाजे बंद करून झेलम नदीचे पाणी रोखण्याची तयारी भारताने केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सन १९६० साली सिंधू जल करार करण्यात आला. सिंधू नदी ही पाकिस्तानसाठी जीवन वाहिनी मानली जाते. सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर पाकिस्तानातील २१ कोटी जनतेचे जीवन अवलंबून आहे. पिण्याचे, वापराचे पाणी आणि सिंचन यासाठी सिंधू नदीवर अवलंबून आहे.
भारताने चिनाब नदीचे पाणी बंद केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाची बैठक अध्यक्ष मुहम्मद शब्बीर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यात सध्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. सिंधू नदीची परिस्थिती अशीच बिघडत गेल्यास पाकिस्तानच्या खरीप हंगामात पाण्याची २१ टक्के कमतरता जाणवणार असल्याचे या बैठकीत निदर्शनास आले. भविष्यात पाकिस्तान आतील पाण्याची शेती आणखीनच बिकट होण्याची चिन्ह आहेत.