'पाकिस्तानवर कारवाईसाठी ट्रम्पच्या परवानगीची वाट बघता का?'
प्रकाश आंबेडकर यांचा मोदी सरकारला खडा सवाल
पुणे: प्रतिनिधी
पहिलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा सज्जड पुरावा उपलब्ध झाल्यानंतरही पाकिस्तान वर कारवाई होण्यास का विलंब होत आहे? या कारवाईसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परवानगीची वाट बघता का, असा खडा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला केला आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान विरोधी बाजू मांडण्यासाठी ट्रम्प यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार जेसन मिलर यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल एक लाख 50 हजार डॉलर मोबदला दिला आहे, अशी माहिती आंबेडकर यांनी पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राच्या हवाल्याने दिली आहे. याचा अर्थ भारत पाकिस्तान वर कारवाई करण्यासाठी ट्रम्प यांच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे का, असा सवाल त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. ट्रम्प यांच्याकडून परवानगी मिळाल्याशिवाय भारत पाकिस्तानवर कारवाई करणार नाही का, असा सवालही आंबेडकर यांनी केला.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक आणि एक स्थानिक खेचरवाला बळी पडला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. भारत सरकार देखील याबाबतीत आक्रमक असल्याचे दिसून येत असले तरी देखील प्रत्यक्षात प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी कारवाईच्या विलंबाला अमेरिकेकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे का, असा सवाल निर्माण केला आहे.