विधानसभेतून सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देणार
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रतिपादन
पुणे: प्रतिनिधी
"महाराष्ट्राच्या विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम करताना सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा होईल; त्यांच्या हिताचे निर्णय होतील. कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांना समान न्याय देण्याला आणि जनहिताच्या कामाला प्राधान्य राहील," असे प्रतिपादन विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. भविष्यात समाजातील दुर्बल घटकांसाठी सर्वतोपरी मदत करू. त्यासोबतच शासनाच्या सर्व योजना समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहू,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त अण्णा बनसोडे यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन व नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुमित चौधरी, निखिल गायकवाड व शशिकांत कांबळे यांच्या पुढाकारातून टी३एम फाउंडेशन, निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसंगी राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. प्रकाश पवार, उद्योजक जवाहर चोरघे, निवृत्त पोलीस निरीक्षक विलास सोंडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोडे, नारायण गलांडे,सोनूभाऊ निकाळजे, किशोर धायरकर यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ममता फाउंडेशन या संस्थेला ५१ हजार रुपये, तर जनसेवा फाउंडेशन वृद्धाश्रमाला ३१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. ग्रंथतुलेतील वह्या-पुस्तके गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यावेळी भारतीय संस्कृतीतील विविध कलानृत्य अविष्कार सादर करण्यात आले. पाच ते ५५ वयोगटातील भगिनींनी सहभाग घेतला. तीन यशस्वी संघांना बनसोडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजयश्री इव्हेंट्स चे निखिल निगडे यांनी नृत्य स्पर्धांचे संयोजन केले. बहुजन हिताय संघ वसतिगृह, पंचशील सेवा संघ राम सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
'भारतीय राज्यघटना व संसदीय लोकशाही' या विषयावर बोलताना प्रा. प्रकाश पवार म्हणाले, "विधानसभेचे उपाध्यक्ष ही मोठी जबाबदारी आहे. आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, हिताचे निर्णय होतील, या आशेने सामान्य नागरिक विधिमंडळाकडे पाहत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी करावा. नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसह राज्यातील सर्वच जनतेला न्याय मिळेल." अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संयोजक सुमित चौधरी यांनी केले.
निखिल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत कांबळे यांनी आभार मानले.