'कोण कोणाला गिळतोय ते लवकरच कळेल'
अशोक चव्हाण यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला
मुंबई: प्रतिनिधी
आपण काँग्रेस पक्षात सुमारे पन्नास वर्षे काम केले आहे. कोण कोणाला गिळतो हे आपण जवळून पाहिले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना बराच अनुभव घ्यायचा आहे. त्यांना गिळले गेल्यानंतरच कोण कुणाला गिळते याची जाणीव होईल, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांनी सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेतला.
पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, काँग्रेस फोडा आणि रिकामी करा, असे विधान केले होते. या विधानावर बोलताना, भारतीय जनता पक्ष हा इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते गिळणारी चेटकिण आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते घेऊन या चेटकिणीचे पोट भरलेले नाही. त्यामुळे त्यांनी आता काँग्रेसकडे मोर्चा वळवला आहे, अशी टीका सपकाळ यांनी भाजपवर केली होती. या टीकेवर चव्हाण यांनी पलटवार केला आहे.
आपण काँग्रेसमध्ये पन्नास वर्षे काम केले आहे. आता आपण आपल्या निष्ठा निश्चित केल्या आहेत. आता आपण ज्या दिशेला निघालो आहोत आणि ज्या जागी आहोत त्या जागी समाधानी आहोत. त्यामुळे काँग्रेसच्या अधोगतीबद्दल चर्चा करणे आपल्याला योग्य वाटत नाही, असे सांगतानाच चव्हाण म्हणाले की, पक्ष प्रादेशिक असो वा राष्ट्रीय, ज्याचा संपर्क सर्वसामान्य जनतेशी कायम असतो, तो पक्ष कधीही संपू शकत नाही. दक्षिणेतील राज्यात दीर्घकाळ अनेक प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कायम आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.