पोलिसांना भोवली गजा मारणेची मटण पार्टी
पोलीस उपनिरीक्षकासह पाच जून निलंबित
पुणे: प्रतिनिधी
पुख्यात गुंड गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली येथे नेत असताना त्याच्याबरोबर धाब्यावर बसून मटण पार्टी करणे पोलिसांना भोवले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
कोथरूड येथे दुचाकी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे आणि त्याचे साथीदार कारागृहात आहेत. सुरक्षेच्या कारणासाठी मारणे आणि त्याच्या साथीदारांची रवानगी सांगली येथील कारागृहात करण्यात आली. पुणे ते सांगली या प्रवासादरम्यान गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी वाटेतील ढाब्यावर मटण पार्टी केली. या पार्टीत गजा मारण्याचे साथीदार आणि अनेक अट्टल गुन्हेगार सहभागी झाले होते. गजा मारण्याच्या बंदोबस्तासाठी बरोबर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस कर्मचारी देखील या पार्टीत सहभागी झाले.
याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेऊन पोलीस सहाय्यक निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच या पार्टीत सहभागी झालेल्या इतर गुंडांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संबंधित पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई करू नये तर त्यांची पोलीस खात्यातून कायमस्वरूपी हकलपट्टी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.