पाक 'शिशुपाला'च्या वैमानिकांना 'सुदर्शना'ची दहशत
लढाऊ विमाने घेऊन रणात उतरण्यास अनेकांचा नकार
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सपशेल फसला. त्यामुळे शंभर अपराध करूनही ताळ्यावर न आलेल्या पाकिस्तानच्या वैमानिकांमध्ये भारताच्या एस 400 अर्थात सुदर्शन आणि आकाश या हवाई सुरक्षा यंत्रणांची दहशत निर्माण झाली आहे. या भीतीपोटीच अनेक वैमानिकांनी लढाऊ विमाने घेऊन रणात उतरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आधीच सडकून मार खाणाऱ्या पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर पाकिस्तानने जम्मू, काश्मीर, पंजाब आणि राजस्थानातील भारताच्या लष्करी आस्थापनांवर ड्रोन, क्षेपणास्त्रांच्या द्वारे हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे प्रत्येक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवेतच निकामी केले. त्याचप्रमाणे चीन आणि अमेरिकेकडून मिळालेली पाकिस्तानची लढाऊ विमाने देखील भारतीय सैन्याने मातीला मिळवली. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलात भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेची दहशत निर्माण झाली आहे.
दुसरीकडे पाकिस्तानला चीनकडून मिळालेल्या HQ 9 आणि HQ 16 या हवाई सुरक्षा यंत्रणांवर मोठा भरवसा होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या भारत-पाक संघर्षात या यंत्रणा पाकिस्तानसाठी पूर्ण कुचकामी ठरल्या. भारतीय ड्रोन, क्षेपणास्त्रे यांनी आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि पाकिस्तानच्या अनेक शहरांना बेचिराख केले.