छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी
नाशिक गुजरात महामार्गावर संशयिताला घेतले ताब्यात
नाशिक: प्रतिनिधी
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे एका भामट्याने आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून संशयिताला नाशिकहून गुजरातला जाणाऱ्या महामार्गावर करंजाळी इथून ताब्यात घेतले आहे. राहुल भुसारे असे त्याचे नाव आहे.
भुसारे याने भुजबळ यांना संपर्क करून आपण आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी केली. तुमच्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्यामुळे त्या ठिकाणी आयकर विभागाची धाड पडणार आहे. धाड टाकणाऱ्या पथकात माझा सहभाग असणार आहे, असेही भुसारे यांनी सांगितले.
तुमच्या फार्महाऊसवर आयकर विभागाची धाड टाकली जाऊ नये, अशी इच्छा असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. त्यासाठी तुम्हीं मला एक कोटी रुपये द्यावे, अशी मागणी भुसारे याने भुजबळ यांच्याकडे केली.

हा प्रकार घडल्यानंतर भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तांत्रिक माहितीच्या आधारे भुसारे याला जेरबंद केले. त्याने अशाच पद्धतीने खंडणीचे गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय आहे.