लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच?
गुलाबराव पाटील यांच्या विधानाने पुन्हा तोंड फुटणार
जळगाव: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महायुतीला अनपेक्षित बहुमत मिळवून दिले. त्यानंतर विरोधकांकडून या योजनेवर टीका केली जात आहे तर महायुतीत या योजनेचे श्रेय कोणाचे, यावर अजूनही वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाने या वादाला पुन्हा तोंड फुटण्याची चिन्ह आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना शिंदे गटाची सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी महिला सदस्य नोंदणी करताना लाडकी बहीण योजनेचा आवर्जून उल्लेख करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले.
महिलांना नोंदणीसाठी आवाहन करताना हा लाडकी बहीण योजना आणणारा पक्ष असल्याचे आठवणीने सांगा. लाडकी बहिण योजनेचे पैसे कोण देतो, तर दाढीवाला बाबा (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) याची जाणीव महिलांना करून द्या, असे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आग्रहाने सांगितले.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात तर ममहायुतीच्या घटक पक्षात लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेण्यासाठी जणू चढाओढ लागली होती. या योजनेचे नावच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल्याने आणि ती शिंदे मुख्यमंत्री असताना लागू झाल्याने अर्थातच त्यांचा मोठा दावा होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केल्याने आणि योजनेसाठी निधी देणाऱ्या अर्थविभागाचे मंत्रीही तेच असल्याने त्याचाही या योजनेवर दावा होता. त्यांनी प्रचार काळात खास लाडक्या बहिणींसाठी गुलाबी जाकीट घालून मेळावे घेतले आणि गुलाबी वाहनांमधून राज्याचा दौरा केला.
'लाडक्या देवाभाऊ' फडणवीस यांनीही लाडक्या बहिणींचे अनेक मेळावे राज्यभर आयोजित केले.