'माझ्यामुळेच थांबले भारत पाकिस्तानातील युद्ध'
ट्रम्प तात्यांनी पुन्हा आळवला श्रेय लाटण्याचा राग
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील युद्ध आपल्यामुळेच थांबल्याचा दावा करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'तात्या' यांनी पुन्हा एकदा श्रेय लाटण्याचा सूर लावला आहे. व्यापाराच्या निमित्ताने आपण दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवल्याचा त्यांचा दावा आहे.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हा दावा केला.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी अमेरिकेच्या व्यापार चालतो. दोन्ही देशांचे नेते महान आहेत. दोन्ही देशातील लोक चांगले आहेत, असे सांगतानाच ट्रम्प यांनी भारत अशी आपली विशेष मैत्री असल्याचे नमूद केले. त्यावेळी रामफोसा यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हा अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशातील मैत्रीचा समान धागा असल्याचे स्पष्ट केले.
पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ, भारतावर हल्ला करण्यासाठी वापरले जाणारे हवाई दलाचे तळ आणि पाकिस्तानच्या व्यापाराचे केंद्र असलेले कराची बंदर उध्वस्त करून टाकले. दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा करण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमातून भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धबंदी झाल्याचे घोषित केले.
ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर भारतात राजकारण पेटले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचे कारण सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. प्रत्यक्षात या युद्धविरामामागे अमेरिकेपेक्षा आखाती देशांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत ही व्यक्त केले गेले. भारत सरकारने पाकिस्तान बरोबर सुरू असलेल्या संघर्षात कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ट्रम्प यांनी कोलांटी उडी घेत आपण भारत आणि पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केली नाही तर केवळ संघर्ष थांबवण्याच्या दृष्टीने मदत केली, असे मान्य केले. मात्र आता पुन्हा ट्रम्प तात्यांची खुमखुमी वाढल्याचे दिसून येत आहे.