'पाकिस्तानला नाणेनिधी कडून मिळणारी मदत का रोखली नाही?'
पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रोकडा सवाल
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे. विस्तारवादी दृष्टिकोनातून अन्य राष्ट्रांवर दादागिरी करणाऱ्या चीनचा तो निकटवर्ती सहयोगी आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी पाकिस्तानला मदत करून एका परीने चीनच्याच तुंबड्या भरत आहे. असे असताना अमेरिकेने आपल्या प्रभावाचा वापर करून आंतरराष्ट्रीय नाणे निधीची पाकिस्तानला होणारी मदत का रोखली नाही, असा रोकडा सवाल अमेरिकेचे सैन्य रणनीतीकार आणि पेंटागॉन या अमेरिकन संरक्षण दलाच्या मुख्यालयाचे माजी अधिकारी मायकेल रुबीन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केला आहे. अजूनही नाणेनिधीकडून पाकिस्तानला मिळणारी मदत थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पाकिस्तान हे चीनच्या हातातील बाहुले
रुबीन यांनी प्रसिद्ध केलेल्या एका लेखात पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तान हा चीनचा गुलाम आहे. चीनच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले आहे. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे पाकिस्तानवर चीनचे तब्बल 40 दशलक्ष डॉलरचे कर्ज आहे. त्यामुळे पाकिस्तानला केलेली आर्थिक मदत ही अप्रत्यक्षपणे चीनच्याच घशात जाणार आहे, असेही रुबीन यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे केले कौतुक
एकीकडे पाकिस्तानला नाणेनिधीने दिलेली मदत न रोखल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाला खडे बोल सुनावतानाच रुबीन यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूर चे कौतुक केले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. पाकिस्तान दरवेळी भारताविरुद्ध कुरघोड्या करून युद्धाला तोंड फोडतो आणि प्रत्येक वेळी सपशेल हार होऊन देखील विजय झाल्याचे दावे करतो. यावेळी मात्र पाकिस्तानची हार जगापुढे उघडी पडली आहे, असे रुबीन यांनी म्हटले आहे. एकीकडे अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे नाणे निधीकडून दहा लक्ष डॉलर एवढी मोठी रक्कम पाकिस्तानच्या घशात जाऊ देणे योग्य नाही, असेही त्यांनी ट्रम्प प्रशासनाला सुनावले आहे.
ऑपरेशन सिंधूच्या यशामुळे भारताने राजनैतिक आणि लष्करी अशा दोन्ही पातळ्यांवर पाकिस्तानवर निर्विवाद विजय प्राप्त केला आहे. भारताच्या कारवाईत बळी पडलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला लष्करी गणवेशात उपस्थित राहिलेले पाकिस्तानी अधिकारी पाहिल्यानंतर पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि दहशतवादी यांच्यात काहीच फरक नसल्याचे जगाला स्पष्टपणे कळून चुकले आहे, अशी टीकाही रुबीन यांनी केली.