'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भरला सज्जड दम
भूज: वृत्तसंस्था
पाकिस्तानवर आतापर्यंत करण्यात आलेली लष्करी कारवाई हा फक्त ट्रेलर आहे. युद्धबंदीच्या काळात पाकिस्तान चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर आहे. पुन्हा त्यांनी काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण चित्रपट दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सज्जड दम भरला आहे.
राजनाथ सिंह यांनी भूज येथील हवाई तळाला भेट देऊन ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल जवानांचे कौतुक केले. तसेच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडतो आहे. हा भारत सहन करत नाही तर चोख प्रत्युत्तर देतो, हे भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमधून दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाकिस्तानची वागणूक सुधारली नाही तर त्यांना पुन्हा धडा शिकवला जाईल आणि तो आत्ताच्या पेक्षा अधिक कडक असेल, असा इशाराही सिंह यांनी दिला.
पाकिस्तानला निधी देण्याबाबत पुनर्विचार करावा
पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसणारा देश आहे. त्याला दिला जाणारा निधी हा दहशतवादी कारवायांसाठीच वापरला जाणार आहे. पाकिस्तानने लष्कर ए तैय्यबाचा म्होरक्या मसूद अजहर याला 14 कोटी रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे ते जैश ए मोहम्मदला देखील निधी दिल्याशिवाय राहणार नाहीत. पाकिस्तानला देण्यात आलेली कोणतीही मदत म्हणजे दहशतवादाला दिलेली मदतच ठरणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पाकिस्तानला निधी देण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, असे आवाहनही राजनाथ सिंह यांनी केले.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 14 ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले. त्याचप्रमाणे भारतावर आक्रमण करणाऱ्या त्यांच्या हवाई तळांना देखील नष्ट केले. भारताच शस्त्रास्त्रांच्या बाबतीत केवळ विदेशावर अवलंबून नाही. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेचे जगभरात कौतुक झाले. या यंत्रणेत भारतीय बनावटीच्या रडार आणि आकाश या यंत्रणांचाही भरीव सहभाग आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी तर पाकिस्तानी सैन्याचे अंधारात डोळे दिपवले आहेत, असे सांगत राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य दलाच्या आणि वैज्ञानिकांच्या कामाचे कौतुक केले.