ऑनलाईन सट्टेबाजीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
केंद्र सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश
नवी दिल्ली: प्रतिनिधी
ऑनलाईन सट्टेबाजीमुळे तरुण पिढीचे नुकसान होत असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून केंद्र सरकारला यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता वाटल्यास राज्यांना देखील आपली बाजू मांडण्यास सांगण्यात येईल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
ऑनलाईन सट्टेबाजीमुळे एकट्या तेलंगणात एक हजाराहून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. जुगाराप्रमाणेच ऑनलाईन सट्टा ही घातक सवय आहे. आयपीएल क्रिकेटवर लाखो लोक सट्टा लावत आहेत. 'क्रिकेटचा देव' म्हणविणाऱ्या खेळाडूपासून अनेक खेळाडू आणि बॉलीवूडपासून टॉलिवूडपर्यंत अनेक तारे, तारका ऑनलाईन सट्ट्याचा प्रचार करीत आहेत.
ऑनलाईन सट्टा खेळताना देशोधडीला लागलेल्या १ हजार २३ जणांनी तेलंगणात आत्महत्या केल्या आहेत. याचे गंभीर दुष्परिणाम केवळ सट्टा खेळणाऱ्यावरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावर होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन सट्टेबाजीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ख्रिश्चन धर्मप्रसारक के ए पॉल यांनी दाखल केली आहे. त्याची पहिली सुनावणी न्या. सूर्यकांत आणि न्या. एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर पार पडली.
केवळ कायदा पुरेसा नाही...
ऑनलाइन सट्टेबाजी हा खरोखरच अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. हा जुगार बंद झालाच पाहिजे. मात्र ऑनलाइन सट्टा रोखण्यासाठी केवळ कायदा पुरेसा ठरू शकणार नाही. लोक आपल्या मर्जीने ऑनलाईन सट्टा लावत आहेत. जसा खुनाच्या विरोधात कठोर कायदा आहे. मात्र, त्यामुळे खून होण्याचे थांबले नाही. तसेच ऑनलाईन सट्टेबाजीचेही आहे, असे खंडपीठाने यावेळी नमूद केले.