राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक
वैष्णवी आत्महत्या प्रकरणी योग्य कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पुणे: प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र सोनवणे आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी योग्य न्याय केला जाईल. नियमात बसत असल्यास हगवणे कुटुंबीयांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदे अंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला गेल्याने वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या वडिलांचा आरोप आहे. याप्रकरणी वैष्णवी यांचे पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. सासरे राजेंद्र वजीर सुशील हे फरारी होते. आज सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. याप्रकरणी योग्य न्याय व्हावा आणि तार्किकदृष्ट्या योग्य प्रकारे हे प्रकरण मार्गी लागावे यासाठी पोलीस आवश्यक ती कारवाई करतील. नियमात बसत असल्यास हगवणे कुटुंबीयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
21व्या शतकात सून आणि मुलगी यांच्यामध्ये भेद करणे हे फार मोठे पाप आहे. ते या ठिकाणी घडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून संबंधितांना योग्य ते शासन होईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.