'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका'
देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर कडाडून टीका
कोल्हापूर: प्रतिनिधी
भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला चांगला धडा शिकवला जाईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर द्वारे दाखवून दिले आहे. भारताला पाकव्याप्त काश्मीर पासून कोणताही धोका नाही. मात्र, पाक काबूत काँग्रेस पासून देशाला धोका आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली.
इचलकरंजी येथील तब्बल ७१३ कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ आणि लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आमदार राहुल आवारे यांच्या कामाचे कौतुक केले.
एक राहुल (आवाडे) अडीच किलोमीटर लांब तिरंगा यात्रा काढतो तर दुसरा राहुल (गांधी) विमाने कशी पडली, हल्ले कसे झाले, अशा शंका कुशंका काढतो, अशा शब्दात फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली.
दहशतवादी हल्ल्यात पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला भारताने घेतला. भारतीय सैन्याने शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पाकिस्तानने भारतावर अनेक ड्रोन पाठवले. मात्र, त्यातली एकही शिल्लक राहिले नाही. भारतीय सैन्याने हवेतच ते नेस्तनाबूत करून टाकले. भारताच्या भूमीला स्पर्श करू शकेल असे शस्त्रच पाकिस्तान कडे नाही, असेही फडणवीस म्हणाले.
काँग्रेसचा विचार पाकिस्तानने हायजॅक केला आहे. शेतीचे ड्रोन आणि युद्धाचे ड्रोन वेगळेवेगळे असतात, हे या मूर्खांना कोण सांगणार, असे फडणवीस म्हणाले. पाकिस्तानच्या व्हायरसने यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची शस्त्र सिद्धता आणि शस्त्र निर्मितीतील स्वयंपूर्णता जगासमोर सिद्ध झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरली गेलेली सर्व शस्त्रसामग्री स्वदेशी वनावटीची होती, असा दावाही फडणवीस यांनी केला. पाकिस्तानला धडा शिकवून हा नवा भारत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिले, असेही ते म्हणाले.