सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रदांजली
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या विश्वात अमुल्य योगदान देणारे ज्येष्ठ खगोलभौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानविचारवंत प्रा. डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांना भावपूर्ण श्रदांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, विद्यापीठ सल्लागार परिषदेचे सदस्य राजेशजी पांडे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य चे संचालक प्रा. डॉ. देविदास गोल्हार आदी मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना आदरांजली वाहिली.
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि विज्ञान प्रसारक प्रा. डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांचे २० मे, २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना श्रदांजली वाहण्यासाठी सकाळी ११. ३० वाजता विद्यापीठात दुखवट्याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय विज्ञान, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात बरीच वर्षे अध्यापनाचे कार्य केले. तसेच विभागाशी आणि विद्यापीठाशी त्यांचे नाते सौहार्दपूर्ण होते. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकास आणि लोकाभिमुख साहित्यिकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अत्यंत भावपूर्ण श्रदांजली अर्पण करत असल्याचे प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मान्यवर आणि सर्व उपस्थितीतांनी पुष्पांजली अर्पण करून आणि दोन मिनिटे मौन पाळून प्रा. डॉ. नारळीकर यांना आदरांजली वाहिली.
000