बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार पोलिसांची धाड
पुणे: प्रतिनिधी
खराडी येथे 'प्राईड आयकॉन' नावाच्या व्यापारी इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. कॉल सेंटर चालवणाऱ्या पाच जणांपैकी तिघांना तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या 124 जणांना ताब्यात घेऊन पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या बनावट कॉल सेंटर मधून विशेषतः परदेशी नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'च्या धमक्या देऊन पैसे उकळण्याचे काम सुरू होते.
कॉल सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या या लुबाडणूकीची तक्रार आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडेच केली गेली. केंद्रीय गृहमंत्रालयाने या बनावट कॉल सेंटरची माहिती पुणे पोलिसांना कळवून त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सायबर पोलीस, गुन्हे विभागाचे पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी या कॉल सेंटरवर धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे या लुबाडणुकीच्या कामासाठी वापरले जाणारे 41 मोबाईल फोन्स आणि 62 लॅपटॉप देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
या बनावट कॉल सेंटर प्रकरणात करण शेखावत हा मुख्य आरोपी असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या अन्य चार साथीदारांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून दोघे फरार आहेत. हे सर्वजण गुजरात मधील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.