आनंद गोयल यांची शिवसेना पुणे शहर संघटकपदी नियुक्ती
शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी प्रदान केले नियुक्तीपत्र
पुणे: प्रतिनिधी
शिवसेनेने पुणे शहरातील संघटना अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक (शिंदे गट) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते गोयल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, ही नियुक्ती शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रसारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे.
या प्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे, उपशहरप्रमुख सुनील जाधव, कामगार नेते राजेंद्र शितोळे यांची उपस्थिती होती.
आनंद गोयल हे अलीकडेच शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांच्या संघटनात्मक क्षमतेचा, सामाजिक कार्यांतील सक्रिय सहभागाचा आणि हिंदुत्वावरील निष्ठेचा विचार करून त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रमोद नाना भानगिरे यांनी विश्वास व्यक्त केला की, आनंद गोयल आपल्या कार्यातून आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून शिवसेनेला पुणे शहरात नवीन उंचीवर घेऊन जातील व समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनेला भक्कम आधार देतील.
गोयल यांना या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छा मिळत आहेत. ते आधीपासूनच पर्यावरण संरक्षण, धार्मिक सेवा आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय आहेत. आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते शिवसेनेला पुण्यात अधिक प्रभावी आणि मजबूत बनवतील, असेही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.