भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल
उपकर्णधार पदाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यावर
मुंबई: प्रतिनिधी
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी क्रिकेट संघाची निवड करण्यात आली असून त्याबद्दलची घोषणा भारत क्रिकेट नियमक मंडळाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. संघाच्या कर्णधार पदावर शुभमन गिल याची निवड करण्यात आली असून उपकर्णधार पदाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यावर सोपविण्यात आली आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात शुभमनच्या नेतृत्वगुणाचा कस लागणार आहे.
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी क्रिकेट संघात शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या संघात उपकरण धार ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोन यष्टीरक्षकांचा समावेश आहे. भारताचा स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे तीन महिने भारतीय संघाच्या बाहेर होता. आता तो तंदुरुस्त होऊन इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या संघात सहभागी झाला आहे. जसप्रीत आणि मोहम्मद सिराज या दोघांवर भारतीय संघाकडून जलदगती गोलंदाजीची धुरा असणार आहे. त्यांच्याबरोबरच अर्षदीप सिंह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर या गोलंदाजांचाही संघात समावेश आहे. मोहम्मद शमी याला संघातून वगळण्यात आले आहे.
करुण नायर याची भारतीय क्रिकेट संघात तब्बल आठ वर्षानंतर घर वापसी झाली आहे. इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना सन 2016 मध्ये त्याने त्रिशतक झळकावले होते. त्यानंतर 2017 सालानंतर करुण प्रथमच भारतीय कसोटी क्रिकेट संघाकडून खेळणार आहे. या संघात साई सुदर्शन आणि अर्षदीप सिंह या खेळाडूंना प्रथमच भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली आहे.