शिवसंग्राम लोकसभेच्या तीन, विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही: तानाजीराव शिंदे
ज्योती विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर
पुणे : प्रतिनिधी
महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आगामी काळातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन बांधणीसाठी शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर मंगळवारी पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पार पडले. यानंतर शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती विनायकराव मेटे व प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या प्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते.
लोकनेते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर प्रथमच झालेल्या शिवसंग्रामच्या राज्यस्तरीय शिबिरात सोशल मीडिया आणि संघटना बांधणीत त्याचा वापर याविषयी मॅक्स महाराष्ट्र न्यूजचे रवींद्र आंबेकर यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रानंतर राज्यभरातील पदाधिकऱ्यांनी आपल्या सूचना आणि मनोगत व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. विनायकराव मेटे यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, "शिवसंग्राम संघटना ही साहेबांनी तयार केलेल्या आपल्यासारख्या मावळ्यांच्या जीवावर पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही. हा एक वटवृक्ष आहे, ज्याच्या विचारांची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल. स्व. विनायकराव मेटे यांच्याकडून आपण संघर्ष शिकलेलो आहोत.आजच्या बैठकीमध्ये पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत."
तानाजीराव शिंदे म्हणाले, "महायुतीमध्ये शिवसंग्राम हा भारतीय जनता पक्षाचा सहयोगी घटक पक्ष आहे. गेल्यावेळी शिवसंग्राम पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळेला शिवसंग्रामने लोकसभेच्या तीन जागांवर तयारी सुरू केलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाचे गेल्यावेळी दोन आमदार निवडून आले होते. या वेळेला शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास आहे."
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले, "मेटे साहेबांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झाले होते. तेव्हा आरक्षणदेखील मिळाले होते. आताही मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम पक्षाची तीच भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनात आम्ही पाठीशी आहोत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल. पण ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे.
शिवस्मारकाविषयी माध्यमांनी विचारल्यानंतर काहीशी नाराजी व्यक्त करत शिंदे म्हणाले, सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही शिवस्मारक अडकलेले आहे. मेटे साहेबांचा हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. शिवस्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
Comment List