शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे शिंदे यांच्या शिवसेनेत
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व डॉ नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपसभापती तथा शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
या पार्श्वभूमीवर मंत्रालय समोरील बाळासाहेब भवन येथे उपसभापती तथा शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा.शिल्पा बोडखे यांचे पुष्पगुच्छ व भगवा झेंडा देऊन शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या आशा मामेडी, डॉ. शिल्पा देशमुख यांसह परिणीती पोंक्षे, माध्यम समन्वयक दिनेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. शिल्पा बोडखे म्हणाल्या की, शिवसेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून काहींनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटतं. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील जुमानत नाहीत. या पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चहाड्या करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे. त्यामुळे ठाकरे गटामधून शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत महिला सुरक्षित आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा सन्मान हाच त्यांचा अधिकार या तत्वाचे पालन करणारे आहेत. शिवसेनेत स्त्रियांचा कायमच सन्मान होत असतो आणि त्यांना प्रोत्साहन देखील दिले जाते त्यामुळे महिला मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करत आहेत असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, आगामी काळात राज्यातील शिवसेना महिला सेनेच्या वतीने शिवदुर्गा संवाद मेळाव्याच्या माध्यमातून मतदारसंघांतील कामाचा आढावा घेतला जाईल. तसेच सर्वांना काम करण्यासाठी माझे सहकार्य राहिल अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
Comment List