'विरोधी पक्ष बनले रचनात्मक कार्याचा अभाव असलेल्या नक्षलवादी टोळ्या'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा आरोप
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीची भूमिका पार पाडण्यात अपयश आले आहे. विरोधी पक्षांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. कोणतेही रचनात्मक कार्य नसलेल्या शहरी नक्षलवादी टोळ्यांसारखी अवस्था विरोधी पक्षांची झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना महाराष्ट्रात कमी जागा मिळतील, असा दावा विरोधी पक्ष व्यक्त करीत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना मोदी यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. आम्हाला किती जागा मिळतील याची चिंता करण्यापेक्षा विरोधकांनी त्यांना किती जागा मिळतील याची चिंता करावी. दहा वर्षात विरोधी पक्ष अकार्यक्षम राहिलेले आहेत. त्यांचा जनतेशी असलेल्या संपर्कही संपुष्टात आला आहे. याची फळे त्यांना या निवडणुकीत भोगावे लागणार आहेत, असा इशाराही मोदी यांनी या मुलाखतीत दिला.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या लोकसभेच्या जागांबाबत विरोधकांकडून केला जाणारा दावा वाजवी आहे. त्याला कोणताही आधार नाही. या दहा वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका यामध्ये जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा आणि अन्य निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता भाजप आणि मित्र पक्षांच्या पाठीशी राहील आणि आमचे अधिकारी उमेदवार निवडून देईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.