महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल 

नाना पटोले यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल 

मुंबई: प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुमार दर्जाची झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली असली तरी देखील त्यांच्या विरोधात पक्षात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यांना केवळ पदमुक्त न करता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची लक्षणे आहेत. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहात झाल्यानंतर पटोले यांनी स्वतःच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ई-मेल करून आपल्याला पदमुक्त करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवाला पटोले कारणीभूत असल्याचा आरोप पक्षातूनच होत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मुख्यतः काँग्रेसने उत्तम कामगिरी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, शंभरपेक्षा अधिक जागा लढवून देखील काँग्रेसला केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसच्या या स्थितीला जबाबदार धरून पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. 

हे पण वाचा  'शातिर THE BEGINNING’ चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे पदार्पण*

नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक आहेत. त्यांनी पैसे घेऊन तिकिटे वाटली आहेत, असा गंभीर आरोप नागपूरमधून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी केला आहे. पटोले यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या पार्श्वभूमीवर एरवी आक्रमकपणे प्रत्युत्तर देणारे नाना पटोले सध्या शांतच आहेत. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आपण स्पष्टीकरण देऊ, असे त्यांचे म्हणणे आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल घडून येणे अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us