'महाराष्ट्र मे दो ही गुंडे, कोकाटे और मुंडे'
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई: प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जबरदस्त घोषणाबाजी करून कलंकित मंत्री धनंजय मुंडे आणि महादेव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक असल्याचे दिसून आले. विशेषतः धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आग्रही भूमिका घेतली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खुद्द मुंडे यांच्यावर त्यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. केवळ विरोधकच नव्हे तर सत्तारूढ मित्र पक्षातील आमदार देखील मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी खोटी कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका मिळविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना दोन वर्ष करावासाची सजा सुनावली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधकांची मागणी आहे.
आम्हाला व्यक्त होता आलेच पाहिजे
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या हातात बेड्या घालून विधिमंडळ परिसरात प्रवेश केला. सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. विरोधकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ आपण हातात बेड्या घालून आल्याचे सांगत आव्हाड यांनी, आम्हाला व्यक्त होत आलेच पाहिजे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे अमेरिकेतील भारतीयांना अन्यायाने आणि अपमानित करून परत पाठवल्याचा निषेध करण्यासाठीही आपण बेड्या घातल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comment List