प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण टप्पा २ अंतर्गत मावळातील १,६०२ लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप
मावळात घरकुल योजनेचा १६०२ लाभार्थी कुटुंबांना मंजुरीचे वाटप
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
धानमंत्री आवास योजना - ग्रामीण (टप्पा २) अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील तब्बल २० लाख लाभार्थींना मंजुरीपत्रांचे वितरण तसेच १० लाख लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. मावळ पंचायत समितीत ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात मावळातील १६०२ लाभार्थी कुटुंबांना मंजुरीपत्राचे वाटप मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, बाळासाहेब मतकर यांसह इतर अधिकारी वर्ग, लाभार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत लाभार्थ्यांना तीन हप्त्यांमध्ये अनुदान वितरित करण्यात येते. पहिला हप्ता मंजुरीनंतर मिळतो, दुसरा हप्ता घराचा पाया पूर्ण झाल्यानंतर आणि तिसरा हप्ता घराचे छप्पर पूर्ण झाल्यानंतर वितरित केला जातो.
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील लाखो लाभार्थींचे स्वप्न साकार होत असून, शासनाने घेतलेल्या या पुढाकारामुळे गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेबद्दल लाभार्थींनी समाधान व्यक्त केले असून शासनाच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
About The Author
