'मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिष्टमंडळाला शब्द
पुणे : प्रतिनिधी
मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगतची सुमारे अडीच एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच राहील. यासंदर्भात लवकरच निर्णय करून ही जागा स्मारक उभे करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस काल पुणे दौऱ्यावर आले असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी स्मारक उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली असून, स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाल्याची भावना शिष्टमंडळातील सर्वच प्रतिनिधींनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात ॲड. अविनाश साळवे, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, ॲड. जयदेव गायकवाड, राहुल डंबाळे, शैलेंद्र चव्हाण, रोहिदास गायकवाड, ॲड. अरविंद तायडे, युवराज बनसोडे, शैलेंद्र मोरे व अतुल साळवे यांचा समावेश होता.
मंगळवार पेठेतील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा खाजगी विकसकाला देण्याचा घाट घातला आहे. मात्र, या जागेवर शासनाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना व कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे.
मुरलीधर मोहोळ यांनीही बाबासाहेबांचे चांगले स्मारक उभारण्यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करण्यास सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांचे स्मारक व्हावे, ही भावना पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेची आहे. यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी सांगितले.