'तुम्ही तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष'
लोकसभेत अमित शहा आणि अखिलेश यादव यांच्यात खडाजंगी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून येत आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात खडाजंगी उडाली. जगातील सर्वात मोठ्या पक्षाला अजून आपला अध्यक्ष निवडता येत नाही, असा टोमणा अखिलेश यांनी भारतीय जनता पक्षाला मारला, तर तुम्ही तुमच्या पक्षाचे पुढची पंचवीस वर्ष अध्यक्ष राहणार आहात, अशी टीका अमित शहा यांनी केली.
भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. मात्र, या पक्षाला अद्याप आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडता आला नाही, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी भाजपची खिल्ली उडवली. मात्र, अमित शहा यांनी यादव यांच्या विधानावर पलटवार केला.
माझ्यासमोर इथे जे इतर पक्ष आहेत, त्या पक्षांच्या अध्यक्षपदावर कोण बसणार हे एखादा परिवार ठरवतो. त्यांना चार-पाच जणांपैकी एकाची निवड करायची असते. तुम्ही तर पुढची 25 वर्ष तुमच्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहात. आमच्या पक्षाला 12 -13 कोटी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करावी लागते. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागणारच, असे शहा यांनी सांगितले.