दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बदलले खंडपीठ
सतीश सालियान यांच्या वकिलांची मागणी केली मान्य
मुंबई: प्रतिनिधी
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या पहिल्याच दिवशी न्यायालयाने या याचिकेची सुनावणी घेणारे खंडपीठ बदलण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे.
या याचिकेची सुनावणी न्या. रेवती मोहिते डेरे यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठांसमोर होणार होती. मात्र, या याचिकेत महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. न्या रेवती मोहिते डेरे यांच्या भगिनी वंदना चव्हाण यादेखील राजकारणी असून त्या महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेते आहेत. त्यामुळे सुनावणी दरम्यान खंडपीठ बदलण्याची सूचना खुद्द न्यायालयाकडूनच केली जाऊ शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच हे खंडपीठ बदलावे, अशी मागणी सतीश सालियान यांचे वकील नीलेश ओझा यांनी केली होती.
उच्च न्यायालयाने ही मागणी सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मान्य केली आहे. त्यानुसार या याचिकेवरील सुनावणी यापुढे न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठांसमोर होणार आहे. या खंडपीठाकडून उद्याच तातडीने या याचिकेची सुनावणी घेतली जावी, असा प्रयत्न असल्याचे वकील ओझा यांनी सांगितले आहे.
दिशाच्या मृत्यूप्रकरणी राशीद खान पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेला सतीश सालियान यांची फौजदारी याचिका जोडली जावी, अशी विनंती देखील ओझा यांनी न्यायालयाला केली आहे. त्यांची ही विनंती देखील न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे.
दिशाच्या मृत्यू प्रकरणी सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अपघाताने डोक्याला मार लागल्यामुळे दिशा च मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वडील सतीश सालियान हे विवाहबाह्य संबंधातील महिलेला पैसे देण्यासाठी वारंवार तगादा लावत असल्यामुळे वैतागून दिशाने आत्महत्या केली, असा दावा मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्ट मध करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व तत्कालीन सरकारच्या दबावामुळे करण्यात आल्याचा सतीश सालियान यांचे वकील नीलेश ओझा यांचा आरोप आहे.