भारताच्या नकरानंतर अझरबैजान शिरला पाकिस्तानच्या कुशीत
पाकिस्तान करणार शस्त्रास्त्रांचा पुरवठा
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
भारताचा मित्र देश असलेल्या अर्मेनियाचा शत्रू असलेल्या अझरबैजानला शस्त्र पुरवण्यास भारताने नकार दिल्यानंतर तो देश आता पाकिस्तानच्या कुशीत शिरला आहे. पाकिस्तानने अझरबैजानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये नागोर्नो काराबाख या भूप्रदेशावरून दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे. तुर्कीकडून होणाऱ्या शस्त्र पुरवठ्याच्या जोरावर सन 2020 पर्यंत या संघर्षात अझरबैजानचा वरचष्मा राहिला. त्यानंतर अर्मेनियाने भारताकडून रॉकेट लॉन्चर, तोफा, दारूगोळा, बंदुका आणि क्षेपणास्त्र खरेदी केली. त्यामुळे या संघर्षाचे पारडे फिरले आहे.
हा परिणाम दिसून येताच अझरबैजानने त्रयस्थ राष्ट्रामार्फत भारताकडून शस्त्र खरेदीची इच्छा प्रकट केली. अर्मेनिया भारताकडून जेवढ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करत आहे तेवढ्याच प्रमाणात आपणही आयात करू, अशी ग्वाही या देशाने दिली आहे. मात्र भारताने हा प्रस्ताव साफ नाकारला. कारण अर्मेनिया हा भारताचा सहयोगी देश आहे. केवळ शस्त्रखरेदीच नव्हे तर सामरिक आणि राजनैतिक पातळीवर भारत आणि अर्मेनिया यांच्यात सहकार्य आहे.
भारताने नकार दिल्यानंतर अझरबैजान पाकिस्तानकडून शस्त्र खरेदी करणार आहे. पाकिस्तान अझरबैजानला जीएफ 17 या लढाऊ विमानांची तुकडी लवकरच रवाना करणार आहे. भविष्यात हे दोन्ही देश संयुक्तपणे या विमानांचे उत्पादन करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कंगाल पाकिस्तानमध्ये दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी देखील अझरबैजानने दाखवली आहे.
Comment List